३१ जुलैपूर्वी पीक विमा भरा; एल-निनोच्या संकटात संरक्षणाची संधी; हमीपत्राच्या अटीबाबत संभ्रम; अट रद्द करण्यासाठी केंद्राकडे राज्याचा पाठपुरावा

धाराशिव, दि. २६ जुलै : 

खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साळवे यांनी केले आहे.


यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे राज्यासह धाराशिव जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसून, पुढील कालावधीतही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, पीक विमा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत www.pmfby.gov.in⁠� या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID (Agristack Farmer ID) असणे आणि ई-पीक पाहणीमध्ये पिकांची वेळेत नोंद झालेली असणे आवश्यक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत अर्ज करताना "कोणत्याही बँकेतून पीक कर्ज घेतलेले नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र/हमीपत्र" सादर करण्याची अट असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.
हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी संबंधित हमीपत्राची अट रद्द करण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली असून, जिल्हास्तरावरूनही ही अट शिथिल करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पीक विमा अर्ज भरण्याबाबत तांत्रिक अडचण अथवा अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने आवाहन केले आहे.
 
Top