आषाढी एकादशीनिमित्त श्री रामतीर्थ देवस्थानात भक्तिभावाचा महासागर
हनुमान चालीसा पठण, महाअभिषेक, भव्य वारी शोभायात्रा व महाप्रसादाने भाविक तृप्त
नळदुर्ग, दि. २६ जुलै :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येथील श्री रामतीर्थ देवस्थान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.
श्री रघुवीर महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच महंत श्री विष्णु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी श्री हनुमान चालीसा पठण, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रीराम व हनुमान भक्तांनी मोठ्या श्रद्धेने चालीसा पठणात सहभागी होत महाआरतीचा लाभ घेतला.
सकाळी ७.३० वाजता श्री महादेव, श्रीराम व श्री हनुमान यांचा आकर्षक शृंगार करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता आषाढी एकादशीनिमित्त महाअभिषेक संपन्न झाला. सायंकाळी ५.१५ वाजता मंदिर परिसरातून भव्य आषाढी वारी शोभायात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात भाविकांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी १०८ तुपाचे दीप प्रज्वलित करून तसेच १०८ रुचकीच्या पानांचा हार अर्पण करत श्री हनुमानाची विशेष आरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
कार्यक्रमानंतर श्री रामतीर्थ देवस्थानाच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री रामतीर्थ देवस्थान समितीने पुढाकार घेतले.