ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तेही यशाचे शिखर गाठतात : डॉ. जितेंद्र कानडे ; श्री श्री गुरुकुलमध्ये नीट २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

अणदूर, दि. ३१ जुलै :

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुलमध्ये राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे होते.

यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, पालक मल्लिनाथ लंगडे, भारत बुरजे, सिद्धाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नीट परीक्षेत यशस्वी ठरलेले समर्थ लंगडे (५९४ गुण), प्रणव बुरजे (५२० गुण) आणि समृद्धी पाटील (४८० गुण) यांचा डॉ. कानडे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जितेंद्र कानडे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्द विपुल प्रमाणात असते. मात्र, त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. वैद्यकीय क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शालेय जीवनापासूनच नीटसारख्या स्पर्धा परीक्षांची पायाभूत तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये भक्कम पाया निर्माण करण्याचे कार्य श्री श्री गुरुकुल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पालक प्रतिनिधी मल्लिनाथ लंगडे यांनी विद्यार्थ्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे ही पालकांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
सत्कारमूर्ती समर्थ लंगडे याने सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. समृद्धी पाटील हिने कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर मोठे ध्येय गाठण्याचा संदेश देत समाजसेवेची भावना जोपासून उत्कृष्ट डॉक्टर बनण्याचे आवाहन केले. तसेच मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असेही ती म्हणाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी, तर आभार रामेश्वर सावंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल महाबोले, मंजुषा जोशी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top