भरधाव एसटीची ट्रकला भीषण धडक; चालकासह दोघांचा मृत्यू, १० प्रवासी गंभीर
उमरगा आगाराच्या बसचा शेळगी पुलावर भीषण अपघात; बसचा पुढील भाग चक्काचूर
नळदुर्ग, दि. ३१ जुलै :
सोलापूर येथील मार्केट यार्डजवळील शेळगी पुलावर शुक्रवारी पहाटे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उमरगा आगाराच्या बसने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १० प्रवासी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा आगाराची बस (क्र. एमएच-१४ एलबी-०३८०) पुण्याहून सोलापूर बसस्थानकात आल्यानंतर तेथून उमरगाच्या दिशेने निघाली होती. पहाटेच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील शेळगी पुलावर समोरील ट्रक (क्र. एमएच-१३ एसएक्स-३९४९) याला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, बसचा संपूर्ण पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर प्रवाशांच्या बॅगा व साहित्य रस्त्यावर विखुरलेले दिसून आले.
या भीषण अपघातात बसचालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी उमरगा, ता.तुळजापूर जि. धाराशिव) व नागुबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रामचंद्र प्रभाकर देवघे (अणदूर), विकास प्रकाश पाटील (आळंद, जि. गुलबर्गा), माणिक नागप्पा वायचळ (तांदूळवाडी, ता. दक्षिण सोलापूर), रामलिंग ब्रह्मानंद कापसे (धाराशिव), अभिषेक दीपक चव्हाण (उमरगा), अनिकेत सुभाष राठोड (सातारा), अभिजीत अरुण चव्हाण (नळदुर्ग), नागोराव किस्तू तोडसांग (किणवर, जि. परभणी), अनुराधा अर्जुन चव्हाण (तुळजापूर) आणि तुलसीदास मनोहर पाचंगे (गुंजोटी, ता. उमरगा) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिस, वाहतूक पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.