'३५ वर्षांची निष्ठा डावलली; एमआयएमने दिला न्याय' ; धाराशिव जिल्ह्यात गावागावांत संघटन विस्ताराचा निर्धार; सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर लढणार – शहाबाज काझी
नळदुर्ग, दि. ३१ जुलै : शिवाजी नाईक
"काँग्रेसमध्ये तब्बल ३५ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही माझ्यावर अन्याय झाला. नगराध्यक्षपदाची उमेदवारी डावलण्यात आली. मात्र एमआयएमने माझ्या कार्याची दखल घेत न्याय दिला. आता धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावात पक्षसंघटन उभारून सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेत जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारणार," असा ठाम निर्धार एमआयएमचे नवनियुक्त धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच माध्यमांशी ("तुळजापूर लाईव्ह"शी) संवाद साधताना काझी म्हणाले, "एमआयएमला धाराशिव जिल्ह्यात अधिक सक्षम पर्याय म्हणून उभे करण्यासाठी व्यापक संघटनात्मक मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुका, शहर आणि गावात पक्षाच्या शाखा मजबूत केल्या जातील. जुने-नवे कार्यकर्ते, युवक, महिला आणि सर्व समाज घटकांना विश्वासात घेऊन जिल्हा व तालुका समित्यांची पुनर्बांधणी केली जाईल. जनतेच्या अडीअडचणी सोडविणे आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणे, हेच माझे पहिले प्राधान्य राहील."
काझी यांनी काँग्रेसमधील आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, "मी जवळपास साडेतीन दशके काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी झटत राहिलो. अनेकांनी सत्तेच्या राजकारणासाठी पक्ष बदलले; मात्र मी काँग्रेसची साथ कधीही सोडली नाही. परंतु नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतानाही माझी उमेदवारी डावलण्यात आली.त्यांनी नाव न घेता काँग्रेसशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे केवळ माझ्यावरच नव्हे, तर पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि मुस्लिम समाजाच्या भावनांवरही अन्याय झाला."
ते पुढे म्हणाले, "ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांनी यापूर्वी अनेक पक्ष बदलले होते. तरीही त्यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला करण्यात आले. ही बाब मनाला वेदना देणारी होती. त्यामुळे काँग्रेसमधील अन्याय सहन न झाल्याने मी एमआयएममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."
"एमआयएमने मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन सन्मान दिला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माझा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र पक्ष नेतृत्वाने माझ्या कार्यावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. या विश्वासाला पात्र ठरत जिल्ह्यात पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणार," असे काझी यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्दे
धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक तालुका व गावात एमआयएमची संघटनात्मक बांधणी.
जुने-नवे कार्यकर्ते, युवक व महिलांना समान संधी.
सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष.
काँग्रेसमध्ये अन्याय झाल्याचा आरोप; एमआयएमने न्याय दिल्याचा दावा.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत पक्षविस्तारावर भर.