लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम व्हावा; पत्रकारांनी जनतेचा आवाज बनावे : सुनील बनसोडे ;नळदुर्गमध्ये पत्रकार अरुण लोखंडे, जि.प. सदस्य सुनील बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल विशाल भालेराव यांचा उत्स्फूर्त गौरव
नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :
पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून लोकशाहीचा सजग प्रहरी आणि शासन-प्रशासन व जनतेतील विश्वासाचा भक्कम दुवा आहे. समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी निःपक्षपाती, निर्भीड आणि लोकहिताची पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नळदुर्ग आणि मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या मराठवाडा विभाग सचिव तथा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार अरुण लोखंडे, तसेच महाराष्ट्र पोलीस दलात सुरक्षा रक्षक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल विशाल भालेराव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दिमाखदार सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार अरुण लोखंडे , कैलास गवळी, अनिल गायकवाड तसेच डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक मारुती खारवे यांनीही मनोगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार एस. के. गायकवाड यांनी केले, तर आभार पत्रकार शामकांत नागीले यांनी मानले.
यावेळी पत्रकार विजय पिसे, सतीश राठोड, आकाश अलकुंटे, सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव, महादेव मोरे, दत्तात्रय कांबळे, धर्मराज देडे, अरविंद लोखंडे, बाबा कांबळे, उमेश गायकवाड, भीमराव जाधव, अजय दुपारगुडे, राकेश बनसोडे, प्रकाश माने, बंटी माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.