आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; नळदुर्ग जि.प. प्रशालेतील रिक्त शिक्षक पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :
शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत रिक्त शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा दि. ३१ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याने सध्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांनी दिलेल्या पत्रानुसार, सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, निवडणूक मतदार यादी पुनर्तपासणी, बीएलओ तसेच एसआयआरसारख्या शासकीय कामकाजामुळे शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. ही कामे पूर्ण होताच रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना दिलासा मिळाला असून, शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.