नळदुर्ग जनता दरबारात समस्या मांडल्या थेट; ३३ अर्जांद्वारे नागरिकांचा आवाज

मंदिर परिसर स्वच्छता, उद्यान व्यवस्थापन व सभागृहांच्या मागण्यांचा ठसा; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :

नळदुर्ग शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील व्यासनगर येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट) नगरपालिकेच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात आयोजित जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दरबारात विविध नागरी समस्यांबाबत एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले.
नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील वाढलेली झाडे हटविणे, मंदिरासमोरील गटारांची स्वच्छता करणे, हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाची स्वच्छता राखणे आदी प्रश्नांचा समावेश होता. तसेच उद्यानातील भाडेतत्त्वावर दिलेला हॉल रिकामा करून तो महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांनी केली.

याशिवाय शिवनेरी मंडळ हॉलचे बांधकाम पूर्ण करणे, माऊलीनगर येथील लोकमान्य हाउसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक सभागृह उभारणे, तसेच व्यासनगरमधील नितीन कुलकर्णी यांच्या घराजवळील खड्डा मुरूम टाकून बुजविण्याची मागणीही करण्यात आली. अशा विविध स्वरूपाच्या एकूण ३३ तक्रारी प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी स्वच्छतेबाबत संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले. इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

या जनता दरबारात नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक दत्तात्रय दासकर, मीनाक्षीताई काळे, तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, किशोर नळदुर्गकर, सुधीर पुराणिक, सुनिल उर्फ बबन चौधरी, स्वप्निल काळे, अक्षय भोई, किरण दुस्सा, संदीप गायकवाड, संदीप सातपुते, शुभम हजारे, सुभाष कोरे, सुदर्शन पुराणिक यांच्यासह नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, कर्मचारी विकास कांबळे, फुलचंद सुरवसे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दरबारातून नागरिकांच्या समस्यांना थेट प्रशासनापर्यंत पोहोच मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
 
Top