स्मारकाचे काम लवकरच मार्गी; साठेनगरच्या विकासाला प्राधान्य – नगराध्यक्ष बसवराज धरणे ; साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; युवकांनी विचार आत्मसात करण्याचे आवाहन
नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. तसेच साठेनगर परिसरातील विविध विकासकामांना प्राधान्य देत त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साठेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नळदुर्ग शहरात शनिवारी (दि. १) साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक आणि गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, काँग्रेसचे तुळजापूर तालुकाध्यक्ष अॅड. अरविंद बेडगे, एमआयएमचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी, नगरसेवक शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, संदीप सुरवसे, माजी नगरसेवक महालिंग स्वामी, समाजवादी पक्षाचे कुरेशी, फुरखान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अॅड. अरविंद बेडगे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकत, त्यांच्या साहित्य व विचारांतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश मिळतो. युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढे यावे, असे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात लहान मुलांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगते सादर केली. विविध सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश गायकवाड, बाबा काळे, नागनाथ भिडे, ज्ञानेश्वर काळे, अरुण देडे, अविनाश काळे, धनराज गायकवाड, नारायण हजारे, नवनाथ काळे, अजय गायकवाड, प्रकाश काळे, राजेंद्र काळे, लहू देडे, धनराज चव्हाण, मोरेश्वर देडे यांच्यासह लहु सैनिक, महिला व नागरिकांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे स्वागत व आभार आयोजकांच्या वतीने मानण्यात आले.