महायुतीने दिलेला शब्द पाळावा; स्वीकृत नगरसेवकपदी ज्ञानेश्वर घोडके यांनाच संधी द्या, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची ठाम भूमिका; निवडणूकपूर्व आश्वासनाची आठवण
नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :
नळदुर्ग नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत शिवसेना (शिंदे गट)चे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांचीच नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी शिवसेना शिंदे गटाचे प्रमोद कुलकर्णी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात शिवसेना (शिंदे गट)ला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर शिवसेनेने विजय मिळवत महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भाजपासोबत खांद्याला खांदा लावून महायुतीचा झेंडा पालिकेवर फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीने काम केल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
याच निवडणुकीदरम्यान झालेल्या महायुतीच्या बैठकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांना प्रथम स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूर तालुक्याचे नेते सुनील (मालक) चव्हाण, नगराध्यक्ष बसवराज धरणे तसेच उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार यांच्यासह प्रमुख महायुती नेत्यांच्या उपस्थितीत देण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्यामुळे महायुतीचा धर्म जपत भाजपाने दिलेला शब्द पाळावा आणि स्वीकृत नगरसेवकपदी ज्ञानेश्वर घोडके यांचीच वर्णी लावावी, अशी जोरदार मागणी प्रमोद कुलकर्णी यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे नळदुर्गच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.