'चांगली ट्रॅव्हल्स बस देतो' म्हणत १७ लाखांचा गंडा; तुळजापूर तालुक्यातील दाम्पत्याची आर्थिक फसवणूक; परळीच्या आरोपीविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा

नळदुर्ग, दि. २ ऑगस्ट : 

ट्रॅव्हल्स बस खरेदीच्या व्यवहारात जळकोट ता.तुळजापूर येथील दाम्पत्याला चांगल्या स्थितीतील जुनी बस देण्याचे आमिष दाखवत तब्बल १७ लाख ७१ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करून मोठी रक्कम उकळल्यानंतर खराब अवस्थेतील, स्वतःच्या मालकीची नसलेली आणि कागदपत्रे अपूर्ण असलेली बस देऊन पुन्हा ती परत नेल्याचा आरोप असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद विष्णू मुंडे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड, सध्या रा. वासुदेव हाइट्स, मानाजी नगर, पुणे) याने जळकोट (ता. तुळजापूर) येथील उषा पुरुषोत्तम नवगिरे (वय ३७) व त्यांच्या पती यांच्याशी संपर्क साधून चांगल्या दर्जाची जुनी ट्रॅव्हल्स बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून ₹17.71 लाख स्वीकारले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला जी बस दिली ती खराब अवस्थेतील, स्वतःच्या नावावर नसलेली तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झालेली असल्याचे समोर आले. "कागदपत्रे क्लिअर करून देतो," असे सांगून आरोपीने ती बसही परत नेली. मात्र, त्यानंतर ना बस परत दिली, ना घेतलेली रक्कम परत केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी उषा नवगिरे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) व ३१६(२) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, नळदुर्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ठळक बाबी
₹17.71 लाखांची आर्थिक फसवणूक
जुनी ट्रॅव्हल्स बस देण्याचे आमिष
खराब व कागदपत्रे अपूर्ण असलेली बस दिल्याचा आरोप
'कागदपत्रे पूर्ण करून देतो' म्हणत बसही परत नेली
परळीच्या आरोपीविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

जाहिरात 
 
Top