टिळकांच्या राष्ट्रभक्तीचा, अण्णाभाऊंच्या समतेच्या विचारांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारसा; तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळेत लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
कळंब, दि. १ ऑगस्ट :
तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रभक्ती, शिक्षणाविषयीचे विचार आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" या प्रेरणादायी घोषणेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीच्या संघर्षमय कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संतोष भोजने व सहशिक्षक संतोष मोहिते यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक संवेदनशीलतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास सयाजी शिंदे, शिक्षिका आशा पवार, रसिका आगरकर, मध्यान्ह भोजन कर्मचारी रुक्मिणी डिकले व मयुरी डिकले, पालक प्रतिनिधी राम माने तसेच अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही महापुरुषांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त करत त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प केला. राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.