नळदुर्ग शहरात एसआयआरची धडाकेबाज मोहीम; ९६ टक्के काम पूर्ण,  बीएलओंना प्रशासनाचा दणका; ७ जणांना नोटीस, काम अंतिम टप्प्यात

नळदुर्ग, दि. ४ ऑगस्ट :

नळदुर्ग शहरातील दहा प्रभागांमध्ये विशेष पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेअंतर्गत बीएलओंकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, आतापर्यंत सुमारे ९६ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे यांनी दिली. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले असून, काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या मोहिमेत दिरंगाई करणाऱ्या ७ बीएलओंना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात असून, यापूर्वीही तुळजापूर तालुक्यातील दोन बीएलओंना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवरही वेळेत काम पूर्ण करण्यासाठी दबाव वाढला आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १७ बीएलओ हे काम पार पाडत आहेत. या मोहिमेची अंतिम मुदत दि. ८ ऑगस्ट असून, आता अत्यल्प कालावधी शिल्लक राहिल्यामुळे कामाला वेग देण्यात आला आहे.

दरम्यान, काही मतदार प्रत्यक्षात सापडत नसल्यामुळे ते स्थलांतरित झाले आहेत की मयत झाले आहेत, याची खात्री करण्याचे कामही सुरू आहे. या प्रक्रियेमुळे कामाची अचूकता राखण्यावर भर देण्यात येत आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार नळदुर्ग शहराची लोकसंख्या १८ हजार ३४१ इतकी असून, मतदारसंख्या सुमारे १७ हजार २० एवढी आहे. प्रशासनाकडून या सर्व मतदारांची अद्ययावत नोंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अंतिम मुदतीपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जाहिरात 


 
Top