मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात मोठे बदल; भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
मुंबई, दि. ४ ऑगस्ट :
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करत सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या संदर्भातील आदेश आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केले असून, राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयोगाच्या आदेशानुसार, १ ऑक्टोबर २०२६ या पात्राच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात काही टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बीएलओमार्फत घरोघरी भेटी ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत.
त्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे पुनर्रचनेचे काम पूर्ण करण्यात येईल. २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध असेल.
प्राप्त दावे व हरकतींची पडताळणी करून त्यावर २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत निर्णय घेतला जाणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित वेळापत्रकाची तातडीने माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी विविध माध्यमांतून करण्यासह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही लेखी स्वरूपात सुधारित वेळापत्रकाची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या सुधारित कार्यक्रमामुळे मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, नाव वगळणे किंवा नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना अधिक वेळ उपलब्ध होणार असून आगामी निवडणुकांसाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यास मदत होणार आहे.