कर थकबाकीदारांना पालिकेचा अंतिम इशारा; थकित कर न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई ; शासकीय कार्यालयांसह संस्थांकडे तब्बल ३२ लाखांची थकबाकी

नळदुर्ग, दि. ६ ऑगस्ट :

नळदुर्ग नगरपालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, कर न भरणाऱ्या सर्व थकबाकीदारांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात येणार आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही कराचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दिला आहे.

नगरपालिकेच्या हद्दीतील बीएसएनएल, एसटी, शैक्षणिक संस्था, रुग्णालये तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांकडे मिळून तब्बल ३२ लाख रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांकडून नियमित कर वसूल होत असताना, सार्वजनिक संस्थाच कर भरण्यात मागे असल्याने नगरपालिकेच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत आहे. परिणामी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामांसाठी आवश्यक निधीवर ताण निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नगरपालिकेच्या नोंदीनुसार, बालाघाट शिक्षण संस्था ही सर्वाधिक थकबाकीदार असून संस्थेकडे ८ लाख ७ हजार ७०६ रुपये कर थकीत आहे. त्यानंतर बीएसएनएल कार्यालयाकडे ३ लाख ६९ हजार २६६ रुपये, तर एसटी बसस्थानकाकडे ३ लाख ३१ हजार ७०७ रुपये थकबाकी आहे. या तीन संस्थांकडील थकबाकीच एकूण थकबाकीच्या मोठ्या भागावर आहे.
याशिवाय जिल्हा परिषद शाळा, वसंतनगर (२ लाख २४ हजार २० रुपये), आश्रमशाळा, वसंतनगर (१ लाख ५४ हजार ३२ रुपये), प्राथमिक आरोग्य केंद्र (१ लाख ४७ हजार ५३७ रुपये), सरकारी दवाखाना (१ लाख ४४ हजार ८१६ रुपये), उपजिल्हा रुग्णालय (५६ हजार ५८० रुपये), राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विश्रामगृह (एक लाख २२ हजार रुपये), शासकीय विश्रामगृह, माऊलीनगर (एक लाख २१ हजार ६६५ रुपये), महावितरण ३३ के व्ही केंद्र (९६ हजार २५२ रुपये) आणि एमएसईबी १३३ केव्ही केंद्र (९५ हजार ४२० रुपये) यांच्याकडेही मोठी थकबाकी आहे.
तसेच पोलीस परेड ग्राउंड व निवासस्थान (७९ हजार ९२३ रुपये), जिल्हा परिषद हायस्कूल, बौद्धनगर (७९ हजार ८५० रुपये), पशुवैद्यकीय दवाखाना (४१ हजार रुपये), पोस्ट ऑफिस (४० हजार ७५८ रुपये), जलसंपदा विभाग (५२ हजार रुपये), जि.प. प्राथमिक कन्या शाळा (५८ हजार ९०४ रुपये), जि.प. शाळा, भीमनगर (३७ हजार २७६ रुपये), शासकीय गोदाम (६९ हजार ८४ रुपये), जि.प. केंद्रीय शाळा, माऊलीनगर (२३ हजार रुपये), सार्वजनिक बांधकाम विभाग, माऊलीनगर (३७ हजार ४०० रुपये), महामार्ग पोलीस केंद्र (३० हजार २२२ रुपये) आणि जि.प. प्राथमिक शाळा, इंदिरानगर (४३ हजार ५६ रुपये) यांनीही अद्याप कराचा भरणा केलेला नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

नगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करावरच शहरातील विकासकामे आणि मूलभूत सुविधा अवलंबून असल्याने, या थकबाकीचा थेट परिणाम नागरी सेवांवर होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार विभागांना नोटिसा बजावून विशेष करवसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, नियोजित मुदतीत कर न भरल्यास जप्तीसह कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांकडून वेळेवर कर वसूल केला जात असताना, शासकीय कार्यालयांकडूनच कर भरण्यात होत असलेला विलंब नागरिकांमध्ये नाराजीचा विषय ठरत आहे. "सरकारी यंत्रणाच कर भरण्यात कुचराई करत असेल, तर सामान्य नागरिकांकडून वेळेवर कर भरण्याची अपेक्षा कशी करायची?" असा सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top