खोट्या नोटरी कराराच्या आधारे न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप;  पवनचक्की कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

नळदुर्ग, दि. ७ ऑगस्ट :

 पवनचक्की कंपनीने बनावट नोटरी करार तयार करून तो न्यायालयीन कामकाजात सादर केल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नोटरी वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन भास्कर घुगे (रा. हगलूर, ता. तुळजापूर) यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे शुक्रवारी (दि. ७) निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, कंपनीने बूम असेंब्लीसाठी जमिनीचा मोबदला दिल्याचे दर्शविण्यासाठी बनावट नोटरी करार तयार करून तो मुख्य पुरावा म्हणून उपविभागीय अधिकारी (एसडीएम) धाराशिव यांच्या न्यायालयात सादर केला. या दस्तऐवजाच्या आधारे त्यांच्या कुटुंबाविरोधात खंडणीचा आरोप करण्यात आला तसेच त्याच आधारे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस संरक्षणाचा आदेश मिळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

घुगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित नोटरी करारामध्ये त्यांच्या स्कॅन केलेल्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आला असून, साक्षीदार म्हणून श्रीमती महानंदा सुधाकर गोवे यांचा फोटो वापरून त्याखाली खोटे नाव व बनावट इंग्रजी स्वाक्षरी करण्यात आली आहे. तसेच नोटरी करारासाठी वापरण्यात आलेल्या स्टॅम्प पेपरची खरेदीही बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, कराराच्या दिवशी आपण शासकीय सेवेत कार्यरत असल्याने नोटरी कार्यालयात गेलोच नसल्याचा दावा घुगे यांनी केला आहे. पूर्वी दिलेल्या एका पावतीवरील स्वाक्षरी स्कॅन करून ती नोटरी करारावर वापरण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात एकाच स्टॅम्प क्रमांकावर ६० हजार व ३ लाख रुपयांचे दोन वेगवेगळे करार तयार करण्यात आल्याचा, नोटरी रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचा, तसेच आधारसारखा ओळखपुरावा जोडण्यात न आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

निवेदनाद्वारे रीनिव्ह ग्रीन एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे संबंधित अधिकारी आणि नोटरी वकील यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  अंतर्गत गुन्हा दाखल करावा, बनावट नोटरी कराराची मूळ प्रत व नोटरी रजिस्टर जप्त करावे आणि संपूर्ण प्रकरणाची राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेमार्फत  तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी धाराशिव, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, पोलीस अधीक्षक धाराशिव तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनावर नितीन घुगे, महानंदा गोवे, रामेश्वर घुगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top