एसआयआर मोहीम : नळदुर्ग शहरातील ३,९२४ मतदारांची नावे वगळली; मयत, दुबार, स्थलांतरित व न सापडलेल्या मतदारांची छाननी; दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
तुळजापूर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; ईएफ वितरण व डिजिटायझेशन ९७.०४ टक्के पूर्ण; प्रशासन अंतिम टप्प्यात
नळदुर्ग, दि. ७ ऑगस्ट :
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत नळदुर्ग शहरातील ३ हजार ९२४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या यादीत मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित तसेच पडताळणीदरम्यान न सापडलेल्या मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पडताळणी केली. या प्रक्रियेत नळदुर्ग शहरातील ३,९२४ मतदारांची नावे वगळण्याची नोंद करण्यात आली असून, अंतिम मुदतीपर्यंत या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुनरीक्षण मोहिमेची मुदत १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचे नाव चुकीने वगळले गेले आहे किंवा मतदार यादीत दुरुस्ती आवश्यक आहे, अशा नागरिकांनी संबंधित बूथस्तरीय अधिकारी अथवा मतदार नोंदणी कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह दि.२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीवरील दावे व हरकतींची सुनावणी तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कक्षात होणार असून, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची खात्री करून आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख आणि तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; ईएफ वितरण व डिजिटायझेशन ९७.०४ टक्के पूर्ण; प्रशासन अंतिम टप्प्यात
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यात ई एफ वितरण आणि डिजिटायझेशनच्या कामाला वेग आला असून, तालुक्याने तब्बल ९७.०४ टक्के प्रगती साधली आहे. त्यामुळे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंतच्या प्रगती अहवालानुसार तालुक्यातील २ लाख ४५ हजार ४५ मतदारांपैकी २ लाख ४५ हजार ४३ मतदारांना ईएफचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख ६९ हजार ९ मतदारांची माहिती यशस्वीरित्या डिजिटायझेशन करण्यात आली असून, संपूर्ण तालुक्यात हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईएफ वितरण आणि डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित केंद्रांवर बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत असून, शिल्लक नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मतदारांनी आपल्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास दुरुस्ती, नवीन नोंदणी अथवा इतर बदल वेळेत करून घ्यावेत, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच शंभर टक्के उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.