शहाबाज काझी यांचा नळदुर्गमध्ये जल्लोषात नागरी सत्कार; हैदर कुरेशी मित्र परिवाराचा पुढाकार; फटाक्यांची आतषबाजी, घोषणांनी शहर दणाणले

नळदुर्ग, दि. ८ ऑगस्ट : अझर शेख

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एम आय एम च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शहाबाज काझी यांची नियुक्ती होताच नळदुर्गसह जिल्हाभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी समाजमाध्यमांद्वारे नियुक्तीची घोषणा केल्यानंतर हैदर कुरेशी मित्र परिवाराच्या वतीने नळदुर्ग येथे शहाबाज काझी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि प्रभावी जनसंपर्कासाठी ओळखले जाणारे शहाबाज काझी यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्याची धुरा सोपवली आहे. सत्काराला उत्तर देताना त्यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, "धाराशिव जिल्ह्यात एम आय एम ची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहू. शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार आणि सर्वसामान्यांच्या न्यायाच्या प्रश्नांवर अधिक ताकदीने लढा उभारू," अशी ग्वाही दिली.

या सत्कार सोहळ्यास हैदर कुरेशी , युसूफ शेख, गौस रिजवी, शायन काझी, मंजूर अली कुरेशी, चांद कुरेशी, रियाज कुरेशी, जाबेर कुरेशी, ताजुद्दीन कुरेशी, अली कुरेशी, जाफर बागवान यांच्यासह  पदाधिकारी, कार्यकर्ते , शहरातील अनेक मान्यवर  उपस्थित होते.
 
Top