राष्ट्रीय पातळीवर डॉ. शिवाजी शिंदे यांचा गौरव; 'बेस्ट अचीवर अवॉर्ड'ने सन्मान
मुरूम, ता. उमरगा, दि. ९ ऑगस्ट :
सामाजिक कल्याण क्षेत्रात निस्वार्थपणे आणि सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत, मुरूम (ता. उमरगा) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे यांना प्रतिष्ठेचा 'बेस्ट अचीवर अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास हरियाणा लँड रेक्लमेशन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (HLRDC) चेअरमन गुरनाम सैनी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा चेअरमन डॉ. राम अवतार शर्मा, इंटरनॅशनल वेल्फेअर ह्युमन राइट्स फाऊंडेशनचे डॉ. राजिंदर सैनी आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्सचे चेअरमन तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. सी. पी. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिंदे यांना स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले.
डॉ. शिवाजी शिंदे हे अनेक वर्षांपासून मुरूम, उमरगा परिसरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी उच्च पद गाठले, मात्र सामाजिक बांधिलकी कायम जपत वंचित, गरीब, अनाथ आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ते सातत्याने धावून जात आहेत. नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखाद्या कुटुंबावरील वैयक्तिक संकट, मदतीसाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.
त्यांच्या याच अविरत लोकसेवेची आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. शिंदे यांना मिळालेला हा सन्मान ग्रामीण भागात प्रामाणिकपणे समाजकार्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो ओळ :
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात मुरूम (ता. उमरगा) येथील डॉ. शिवाजी शिंदे यांना 'बेस्ट अचीवर अवॉर्ड' प्रदान करून मान्यवरांनी गौरव करतानाचे क्षण.