राजमाता जिजाऊंच्या वंशजांचे सपरिवार तुळजाभवानी दर्शन; मंदिरात सन्मान
तुळजापूर, दि. ८ ऑगस्ट :
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी शुक्रवारी सपरिवार श्री तुळजाभवानी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले. कुलदेवतेच्या चरणी साडी-चोळीची ओटी भरून त्यांनी राज्याच्या सुख-समृद्धी, सामाजिक सलोखा आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी आणि पारंपरिक पूजनानंतर राजे अमरसिंह जाधवराव व त्यांच्या परिवाराचे मंदिर प्रशासनाच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले तसेच नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. पूजेचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.
दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजे अमरसिंह जाधवराव म्हणाले, "तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमच्या जाधवराव घराण्याची कुलदेवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा व शक्ती याच देवीकडून लाभली. आज सपरिवार या पवित्र क्षेत्री दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे."
समाजात ऐक्य, बंधुभाव आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केल्याचे सांगत त्यांनी इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याचा गौरवशाली वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी जाधवराव परिवारातील सदस्य, तुळजाभवानी मंदिरातील भोपे पुजारी, स्थानिक नागरिक तसेच जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके, जिजामाता तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजय शेळके, नाना कदम, स्वराज कदम, महेश शिंदे, राहुल जाधव, बालाजी तट, दशरथ तट आदी मान्यवर उपस्थित होते.