एमएचटी-सीईटी यशासाठी नळदुर्ग बालाघाट महाविद्यालयाचा पुढाकार; पालक मेळाव्यात गुणवत्तावाढीचा मंत्र

नळदुर्ग, दि. ९ ऑगस्ट :

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करावे, या उद्देशाने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथे सुरू असलेल्या विशेष सीईटी मार्गदर्शन उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सीईटी सेलच्या वतीने आयोजित पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक बाबुराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी विशेष तयारी वर्ग सुरू आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पालक मेळाव्यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा स्पष्ट करण्यात आली.

सीईटी सेलचे संचालक प्रा. एच. व्ही. पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात येणारे अभ्यास नियोजन, नियमित चाचण्या, मार्गदर्शन सत्रे आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासावर भर द्यावा, असे आवाहन केले.
सीईटी सेलचे समन्वयक प्रा. डी. व्ही. चौधरी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही घटकांनी समन्वयाने प्रयत्न केल्यास निश्चितच घवघवीत यश मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. टी. कदम यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेत कठोर परिश्रमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले. कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयासह उपलब्ध सर्व शैक्षणिक सुविधांचा प्रभावी वापर करून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रा. बी. डी. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top