श्रावणात ज्योतिर्लिंग दर्शनाची पर्वणी; महिलांसाठी एसटीची विशेष बस
घरापासून देवदर्शन अन् पुन्हा घरापर्यंत प्रवासाची सुविधा; ४५ महिलांचा ग्रुप झाल्यावर बस होणार बुक
नळदुर्ग, दि. १८ :
श्रावण मास म्हणजे भक्ती, उपासना आणि देवदर्शनाचा पर्वकाळ. या पवित्र महिन्यात भाविकांना राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगाराने विशेष एसटी बससेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नळदुर्ग परिसरातील महिलांसाठी घरापासून थेट देवस्थान आणि दर्शनानंतर पुन्हा घरापर्यंत पोहोचण्याची सोय करण्यात येणार असल्याने महिला भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विभागीय नियंत्रक अजय पाटील , आगार प्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली
तुळजापूर आगाराच्या वतीने तुळजापूर–परळी वैजनाथ, तुळजापूर–औंढा नागनाथ, तुळजापूर–घृष्णेश्वर आणि तुळजापूर–भीमाशंकर अशा विविध धार्मिक मार्गांवर विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे श्रावणातील ज्योतिर्लिंग दर्शनाची इच्छा असणाऱ्या महिला भाविकांना स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याची आवश्यकता राहणार नाही.
४५ महिला जमल्या की बस थेट बुक!
नळदुर्गहून भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी ये-जा मिळून सुमारे ८०० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. एसटीच्या नियमानुसार महिलांना सवलतीचा लाभ मिळणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीही सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
विशेष बससाठी किमान ४५ महिलांनी प्रवासाची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. ४५ महिलांचा ग्रुप पूर्ण झाल्यानंतरच प्रवासाची तारीख निश्चित करून बस बुक करण्यात येणार आहे. महिलांनी आगाऊ निम्मी रक्कम भरल्यानंतर त्यांच्या क्रमांकानुसार आसन क्रमांक निश्चित केले जाणार आहेत.
आगाऊ रक्कम भरताना नियम लक्षात घ्या
विशेष बस प्रवासासाठी आगाऊ रक्कम जमा केल्यानंतर संबंधित प्रवास रद्द केल्यास भरलेली रक्कम परत दिली जाणार नाही, याची महिला भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष देवदर्शन बससेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला भाविकांनी नळदुर्ग एसटी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक अनिल हांडे व महेश डुकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रावणातील भक्तीमय वातावरणात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची ही संधी महिलांसाठी विशेष ठरणार असून, इच्छुकांनी वेळेत नावनोंदणी करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.