मुलं देण्याचे आमिष; ४७.८८ लाखांचा गंडा!
लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी; महिलांसह आठ जणांवर गुन्हा
धाराशिव, दि. १८ ऑगस्ट :
मुलं देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत एका व्यक्तीकडून तब्बल ४७ लाख ८८ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात समोर आला आहे. पैसे उकळल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची तक्रारही पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय दगडू मदने (वय ३८, रा. सांजा चौक, हनुमान मंदिर परिसर, धाराशिव) यांनी १७ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सन २०२० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपींनी विश्वासात घेऊन दिशाभूल केली. मुलं देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी २५ लाख ८८ हजार रुपये रोख, तर २२ लाख रुपये ऑनलाइन, अशा एकूण ४७ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर फिर्यादीकडे पैशांची मागणी करून, रक्कम न दिल्यास लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अश्विनी श्रीराम पाटील, पार्वती उत्तम देवकते, भुजंग उत्तम देवकते, रेश्मा भुजंग देवकते (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर), श्रीदेवी दत्ता नन्नवरे, दत्ता नन्नवरे (रा. येलमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), जयश्री धुळुबा शिरगिरे (रा. तेर, ता. जि. धाराशिव) आणि दत्ता गंडदे (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आनंदनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.