नळदुर्ग किल्ल्याला पुन्हा मिळणार ऐतिहासिक वैभव; पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

नळदुर्ग, दि. १९ ऑगस्ट : शिवाजी नाईक 

नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती व जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेगाने सुरू आहे. किल्ल्याची ऐतिहासिक वास्तुरचना अबाधित ठेवत पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार पारंपरिक पद्धतीने हे काम केले जात असल्याने किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
किल्ल्याच्या पूर्व बाजूची ढासळलेली तटबंदी दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. जुन्या तटबंदीतील खराब झालेले दगड काढून त्याऐवजी नवीन दगडांचा वापर करून तटबंदीची बांधणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या कामात आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर टाळून ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

मुन्सिफ कोर्टला मिळणार नवा साज

किल्ल्यातील ऐतिहासिक मुन्सिफ कोर्टच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. या ठिकाणची जुनी व जीर्ण झालेली पडवी काढून त्याच धाटणीची आकर्षक नवीन पडवी सागवान लाकडाचा वापर करून साकारली जात आहे. तसेच बाह्य भिंतींचे पाईंटिंग, वॉटरप्रूफिंग आणि प्लास्टरचे कामही हाती घेण्यात आले आहे.

गुळपाणी, चुना अन् बेलपाण्याच्या मिश्रणाचा वापर

किल्ल्याच्या संवर्धनकामात आधुनिक सिमेंट-काँक्रीटचा सर्रास वापर न करता पारंपरिक बांधकाम पद्धतीला प्राधान्य देण्यात आले आहे. वाळू, गुळपाणी, चुना, सुरक्षा व बेलपाणी आदींचे मिश्रण तयार करून ते तटबंदीच्या बांधकामासह पाईंटिंगच्या कामासाठी वापरले जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूची मूळ रचना आणि बांधकामशैली कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राजस्थान, मध्यप्रदेशातील कारागिरांची कसब
या संवर्धन प्रकल्पावर तब्बल ८५ कामगार व कुशल कारागीर कार्यरत असून राजस्थान, मध्यप्रदेश यासह विविध राज्यांतील अनुभवी कारागिरांचा यात सहभाग आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या बांधकामशैलीचा अनुभव असलेल्या या कारागिरांकडून बारकाईने काम केले जात आहे.
संपूर्ण दुरुस्ती व संवर्धनाचे काम तब्बल दोन वर्षे चालणार असून काम पूर्ण झाल्यानंतर नळदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक सौंदर्य आणखी खुलणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह इतिहासप्रेमींच्या आकर्षणात भर पडण्याची शक्यता आहे.
 
Top