शेतकरी संघर्ष समितीच्या रेट्याला यश; ऊस बिलासाठी कारखान्याला २८ ऑगस्टची ‘डेडलाईन’!

धाराशिव, दि. २४ ऑगस्ट : 

गाळप केलेल्या ऊसाची बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभागाचे किरण गायकवाड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न मांडला. यावेळी गायकवाड यांनी संबंधित कारखान्याला २८ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिले अदा करण्याबाबत तातडीचे पत्र दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, नाना पाटील, महेश घोडके, श्रीकांत पोतदार, नेताजी काळे, अजय जगताप, संतोष भोंडवे यांच्यासह शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती.
दरम्यान, संबंधित साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची ऊस बिले २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत त्यांच्या बँक खात्यावर अदा करावीत, अन्यथा पुढील गाळप हंगामासाठी कारखान्याला गाळप परवाना देण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा देण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट होते.

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक सहसंचालकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे समाधान झाले. २८ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा होतात का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
Top