टीबी मुक्त अभियानात गुजनूर ग्रामपंचायतीचा गौरव; सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान

नळदुर्ग, दि. १३ ऑगस्ट : 

तुळजापूर तालुक्यातील गुजनूर ग्रामपंचायतीने ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करत ताम्रपदकाचा मान पटकावला आहे. सलग दोन वर्षांत गावात एकही क्षयरुग्ण (टीबी) आढळून न आल्याने शासनाच्या आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात’ गुजनूर ग्रामपंचायतीने प्रभावी जनजागृती, आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्याची दखल घेत तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी आयोजित गौरव सोहळ्यात ग्रामपंचायतीला ताम्रपदक प्रदान करण्यात आले.
यावेळी सरपंच फुलचंद वाघमारे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत कुंभार, आशा कार्यकर्ती प्रतिभा जयभीम वाघमारे तसेच डॉ. यशवंत नरवडे यांचा प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख होते. उपसभापती रोहिणीताई मेलगिरी यांच्यासह गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, पंचायत समिती सदस्य किसन देडे व वैभव मरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुजनूर ग्रामपंचायतीला मिळालेल्या या सन्मानामुळे गावाच्या आरोग्यविषयक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली असून, ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आशा सेविका आणि ग्रामपंचायत सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
Top