टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा गौरव; तुळजापूर तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींना रौप्य, २२ ला ताम्र पदक ; हगलूर ग्रामपंचायतीची सुवर्णपदकासाठी निवड; आरोग्य विभागाच्या कार्याचा गौरव
तुळजापूर, दि. १२ ऑगस्ट :
क्षयरोगमुक्त भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित "टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा-२०२५" उत्साहात पार पडला. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात ५३ ग्रामपंचायतींना रौप्य पदक, तर २२ ग्रामपंचायतींना ताम्र पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे हगलूर ग्रामपंचायतीची सुवर्णपदकासाठी निवड झाली असून जिल्हास्तरावर तिचा गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आणि पुष्पगुच्छ असे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख होते. उपसभापती रोहिणी मेलगिरी, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, पंचायत समिती सदस्य किसन देडे व वैभव मरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी क्षयरोग प्रतिबंधासाठी प्रथिनयुक्त व पोषक आहार, तसेच स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. टीबीमुक्त गाव घडविण्यासाठी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. रमजानअली शेख यांनी रौप्य व ताम्र पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी पुढील वर्षी सुवर्णपदक मिळविण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करावे, असे मार्गदर्शन केले. तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात विक्रमसिंह देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांचे अभिनंदन केले. "संपूर्ण तुळजापूर तालुका टीबीमुक्त होईपर्यंत ही मोहीम अखंड सुरू राहील. आरोग्य विभागाला आवश्यक ते सर्व सहकार्य प्राधान्याने दिले जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्यास विविध गटांचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, विशेषतः महिला सरपंच, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने यांनी केले. जिल्हास्तरीय पर्यवेक्षक सुनील उंडरे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षयरोग पथकाचे पर्यवेक्षक महेश पाठक, देविदास जाधव, पंचायत समिती कार्यालयाचे तीर्थकर आप्पा, गुरु बेद्रे, तालुका आरोग्य कार्यालयातील तानाजी क्षीरसागर, रामानंद भिसे, विनोद मोरे, विशाल माळी, शहाजी आवटे, प्रवीण आवले, शशी साळुंखे, अजय गायकवाड, सतीश सातपुते, सुरज ढेरे, दीपक माळी आदींनी परिश्रम घेतले.