रोटरी क्लब मुरूम सिटीला तिहेरी मानाचा गौरव; उत्कृष्ट सामाजिक कार्याची रोटरीकडून दखल

मुरूम, दि. १२ ऑगस्ट ( प्रा. सुधीर पंचगल्ले) :

 समाजसेवेची अखंड परंपरा जपत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुरूम सिटीच्या कार्याला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ ने मानाची पोचपावती दिली आहे. वर्ष २०२५-२६ मधील उत्कृष्ट सामाजिक उपक्रमांच्या बळावर क्लबला 'क्लब एक्सलन्स अवॉर्ड', 'डिजिटायझेशन अवॉर्ड' आणि 'बेस्ट अचिव्हमेंट इन पब्लिक इमेज' हे तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

लातूर येथे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्टच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, नावीन्यपूर्ण कार्यपद्धती आणि समाजाशी सातत्याने राखलेला संवाद यामुळे रोटरी क्लब मुरूम सिटीची विशेष दखल घेण्यात आली.

क्लबने वर्षभरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप, शालेय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन, गरजू व विधवा महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीनचे वितरण, महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आरोग्य तपासणी शिबिरे, डॉक्टरांचा सन्मान, वृक्षारोपण मोहिमा तसेच ज्येष्ठ नागरिकांसोबत विविध सण साजरे करण्यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. या उपक्रमांमुळे समाजाच्या विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यात क्लबला यश आले.

या दिमाखदार सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे, डॉ. दीपक पोकळे यांच्यासह राज्यातील विविध भागांतील माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी व सचिव कल्लाप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या समाजोपयोगी कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. क्लबच्या वतीने अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, सुनील राठोड, संतोष कांबळे, बाबासाहेब पाटील आणि डॉ. कमलाकर मोटे यांनी पुरस्कार स्वीकारला.

या तिहेरी यशामुळे रोटरी क्लब मुरूम सिटीच्या पदाधिकारी व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक कार्यासाठी मिळालेला हा सन्मान पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

फोटो ओळ : लातूर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने तिहेरी मानाचा पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष, पदाधिकारी व रोटरीयन.
 
Top