भेसळयुक्त खत विक्रीप्रकरणी  नळदुर्ग पोलिसात तिघांवर गुन्हा; शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

नळदुर्ग, दि. १२ ऑगस्ट : 

भेसळयुक्त रासायनिक खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ३ लाख १ हजार २५० किमतीचे भेसळयुक्त खत विक्री केल्याचा आरोप असून, उर्वरित खताचा साठाही गोडाऊनमध्ये आढळून आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल धर्माप्पा नागराळ (रा. एमआयडीसी, नांदेड), सुचेता खंडेराव स्वामी व ओंकार खंडेराव स्वामी (दोघे रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी महाराष्ट्र फर्टिलायझर अॅण्ड केमिकल प्रा. लि. या कंपनीचा खत उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द झाल्यानंतरही मिश्र खताचे भेसळयुक्त उत्पादन करून ते अणदूर व नळदुर्ग येथील ओंकार कृषी सेवा केंद्रातून विक्रीस ठेवले.

तपासात १०:२०:२० खताच्या १०० बॅगपैकी ८० बॅग, २०:२०:०० खताच्या १०० बॅगपैकी ९२ बॅग आणि १८:१८:१० खताच्या १०० बॅगपैकी ७१ बॅग अशा एकूण मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खताची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच उर्वरित खताचा साठा पुढील विक्रीच्या उद्देशाने गोडाऊनमध्ये ठेवलेला आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कृषी अधिकारी दिनेश प्रल्हादराव बनसोडे (वय ५४, रा. धाराशिव) यांनी ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम व रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करीत असून, भेसळयुक्त खतांच्या विक्रीचे जाळे किती व्यापक आहे, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
 
Top