जिल्हाध्यक्ष काझी यांच्या पुढाकाराने लोहारा शहरत एम आय एमची संघटनात्मक बैठक उत्साहात; नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा निर्धार
लोहारा, दि. १२ ऑगस्ट :
आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम) पक्षाच्या लोहारा तालुका कार्यकर्त्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत तालुक्यातील संघटन बळकट करण्यासह सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीला एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शहबाज काझी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचा उद्देश केवळ निवडणूक राजकारण नसून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी सातत्याने काम करणे हा असल्याचे सांगितले. आगामी पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावांत जाऊन जनसंपर्क वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देत लोहारा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एम आय एम पक्ष कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सर्व धर्मांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणे, सामाजिक सलोखा राखणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे, ही पक्षाची भूमिका असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष शहबाज काझी तसेच उपस्थित मान्यवरांचा कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीचा समारोप "गावागावांत संघटन, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि विकासासाठी कटिबद्ध कार्य" या संदेशाने करण्यात आला.या कार्यक्रमास एम आय एम पक्षाचे लोहारा तालुका अध्यक्ष अमीर हम्ज़ा, मुस्तफा पठाण, धाराशिव चे नगरसेवक अजहर मुजावर , नळदुर्गचे हैदर कुरैशी, युसूफ शेख, गौस रिझवी, जाबी कुरेशी ,मोहसिन फुलारी आदी उपस्थित होते.अशी माहिती नात्यानं काझी यांनी दिली.