धिरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; सकल हिंदू समाजाचे नळदुर्ग पोलिसांना निवेदन
नळदुर्ग, दि. १२ ऑगस्ट :
अहिल्यानगर येथील कंत्राटी कामगार धिरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सकल हिंदू समाज, नळदुर्ग शहरच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ७ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथे धिरज परदेशी यांची निघृण हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर व संतापजनक आहे. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार कपाळावर भगवा टिळा लावल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगव्या टिळ्याच्या कारणावरून एखाद्याची हत्या होणे ही समाजाच्या शांतता आणि सलोख्याला धक्का देणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, सखोल आणि जलदगतीने करण्यात यावा, घटनेमागील नेमके कारण शोधून संबंधित सर्व आरोपी व त्यांच्या सहभागाची चौकशी करावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध झाल्यास आरोपींना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी शासन व तपास यंत्रणेने प्रभावी भूमिका घ्यावी, अशीही मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांच्या धार्मिक श्रद्धा व व्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देताना विलास येडगे, सुधीर हजारे, संतोष पुदाले, गणेश मोरडे, विजय ठाकूर, प्रमोद कुलकर्णी, अतुल हजारे, रवी सुरवसे , रवी पिसके, सन्नी भूमकर,सनी हजारे आदी उपस्थित होते.