अखेर नागझरी तांड्यावर धावली एसटी; विद्यार्थी, ग्रामस्थांचा आनंदोत्सव
नळदुर्ग, दि. १२ ऑगस्ट :
तुळजापूर तालुक्यातील अनेक दशकांपासून वाहतूक सुविधेपासून वंचित असलेल्या नागझरी तांडा येथे अखेर बुधवारपासून राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा सुरू झाली. पहिल्यांदाच गावात एसटी बस दाखल होताच विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त केला. या सेवेमुळे विशेषतः शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागझरी पाटी ते नागझरी तांडा हे अंतर लांब असल्याने ग्रामस्थांना खासगी वाहन, टमटम किंवा अन्य साधनांवर अवलंबून राहावे लागत होते. विशेषतः विद्यार्थिनींना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नियमित एसटी सेवा सुरू झाल्याने सुरक्षित, वेळेवर आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या मार्गावरील पहिली बस चालक बाबासाहेब गाते आणि वाहक श्रीमती वाडकर यांनी चालविली. बसचे पूजन करून वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, चालक व वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ही बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे युवा नेते निखिल घोडके, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, तालुकाध्यक्ष विलास राठोड, पंचायत समिती सदस्य प्रवीण भोसले, सरपंच मधुकर राठोड, अंगणवाडी सेविका उषा पवार, विभागीय नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर, तुळजापूर आगार प्रमुख महेश रामपुरे, सुधीर बामनकर आणि प्रताप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रक महेश डुकरे व अनिल हांडे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी विद्यार्थिनींच्या प्रतिनिधी म्हणून प्रियंका देविदास पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत, "एसटी सेवा सुरू झाल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुरक्षित आणि सुलभ झाला आहे," अशी भावना व्यक्त केली.