आम आदमी पार्टीचे वसीमखान पठाण यांच्या एमआयएम प्रवेशाच्या चर्चांना नळदुर्गमध्ये उधाण
नळदुर्ग, दि. १२ ऑगस्ट :
आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीमखान पठाण हे एमआयएमच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे. माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांची एमआयएमच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मंगळवारी एमआयएमच्या स्थानिक कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वसीमखान पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांचा शाल पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला. या सत्कारानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वसीमखान लवकरच एमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत भूमिका किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.
या सत्कार सोहळ्यास आम आदमी पार्टीचे सचिव अस्लम शेख, फारुख पठाण, युसुफ शेख, शाहेद खान, अल्ताफ खान, बिलाल खान, इम्रान खान, खालेद शेख, हाफिज अली पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वसीमखान पठाण यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेकडे नळदुर्गच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत या चर्चांवर पडदा पडणार की नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.