राष्ट्रीय महामार्ग ६५२ प्रकरण : शेतकऱ्यांचा सोलापुरात आक्रोश; चर्चेनंतर आत्मदहन आंदोलन स्थगित

नळदुर्ग, दि. १४ ऑगस्ट : राष्ट्रीय महामार्ग ६५२ (नळदुर्ग-अक्कलकोट) रस्त्याच्या कामासाठी जमिनी संपादनाच्या प्रश्नावर संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत जोरदार आंदोलन छेडले. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. अखेर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर यांना  शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात जमिनी संपादनासाठी जाहीर केलेल्या ६६ कोटी रुपयांच्या निधीचे काय झाले? संबंधित फाईल कुठे आहे? असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.


यावेळी शेतकरी नेते दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, संजय कलकोटे, महेश घोडके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशांचे पालन न करता प्रशासनाकडून वारंवार पोलीस बळाचा वापर होत असल्याचा आरोप केला.

 न्यायालयाच्या आदेशांची दिशाभूल करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी पुराव्यानिशी शेतकऱ्यांची भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडली.

आंदोलनात संतोष फडतरे, पंडित पाटील, स्वामिनाथ माळगे, पांडुरंग सालपे, दयानंद लोहार, दिलीप पाटील, काशिनाथ काळे, तोलू पाटील, बंडू मोरे, रहीमान शेख, सचिन जवळगे, आजमोद्दीन शेख, पिरपाशा इनामदार, गुलाब शिंदे, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर, श्रीकांत पोतदार यांच्यासह अनेक बाधित शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने राष्ट्रीय महामार्ग विभाग परिसर दणाणून गेला. काही काळ पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या आंदोलनासाठी सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे यांच्यासह देशमुख, कुलकर्णी, शेख तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हजारे व अन्य अधिकारी  बंदोबस्तासह उपस्थित होते.

दरम्यान, शेतकरी संघर्ष समितीचे नेते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते दिलीप जोशी यांनी दिला

 
Top