१२ तासांत दीड लाख रोपांची विक्रमी लागवड;  मुरुम मध्ये 'हरित धाराशिव २.०'चा हरित महायज्ञ

मुरूम, ता. उमरगा, दि. १४  : डॉ महेश मोटे 

महाराष्ट्र शासनाच्या 'हरित धाराशिव अभियान २.०' अंतर्गत उमरगा तालुक्यातील विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात शुक्रवारी भव्य वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या अवघ्या १२ तासांत तब्बल १ लाख ५० हजार रोपांची लागवड करून विक्रमाच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्यात आले. मियावाकी पद्धतीने करण्यात आलेल्या या घनवन लागवडीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
कारखाना परिसरातील १० स्वतंत्र ठिकाणी सुमारे ५ हेक्टर क्षेत्रावर ही मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा व्यापक संदेश देत ५० विविध प्रजातींच्या एकूण १ लाख ५० हजार रोपांचे रोपण करण्यात आले. जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
या वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना समितीचे अध्यक्ष शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सहाय्यक वनसंरक्षक रोहिणी शिनगारे, लोहारा तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर, उमरगा तहसीलदार गोविंद येरमे, सहाय्यक गटविकास अधिकारी जगदेव वगे, विठ्ठल साई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसणे, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन शिंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी वनस्पती तज्ज्ञ डॉ. संजय बिराजदार, डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. राम बजगिरे यांच्यासह वनरक्षक गजानन दांडगे, अरुण चौघुले, सूर्यकांत माळी, विवेक गंगणे, वैभव पानसरे, विशाल धनके यांनी वृक्षलागवडीत पुढाकार घेतला.
या हरित महायज्ञात विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. श्री माधवराव पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन विद्यालय, आदर्श विद्यालय, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसी, मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज, बी.एस.एस. महाविद्यालय यांसह अनेक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

तसेच संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट (दिल्ली-सोलापूर झोन, मुरूम शाखा) चे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार, प्रचारक चंद्रकांत चव्हाण, मुखी दयानंद साखरे, प्रा. डॉ. महेश मोटे, सुनील पिसके, हरिकिशन पवार, अमोल साबळे तसेच सेवादलाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.

विठ्ठल साई साखर कारखाना, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या प्रभावी नियोजनामुळे हा महाउपक्रम यशस्वी ठरला. प्रशासन, वन विभाग आणि नागरिकांच्या अभूतपूर्व सहभागातून उमरगा तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला असून, या विक्रमी वृक्षलागवडीने संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
Top