जुगार अड्ड्यावर नळदुर्ग पोलिसांचा छापा; पाऊण लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले 

नळदुर्ग, दि. १४ ऑगस्ट : 
जुगारविरोधी मोहिमेला गती देत नळदुर्ग पोलिसांनी गुळहळ्ळी (ता. तुळजापूर ) शिवारातील एका शेतातील घराशेजारी सुरू असलेल्या तिरट मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार ६०० रुपयांचा रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने गुळहल्ली शिवारातील मच्छिंद्र बनछेडे यांच्या शेतातील घराशेजारी छापा टाकला. यावेळी मल्लीनाथ आप्पाराव पटणे (वय २९), गणेश मारुती क्षिरसागर (वय ३८), सचिन वसंत चव्हाण (वय ३५), काशिनाथ विश्वनाथ हलकंबे, रंगा बळी निकम (वय ५०), रामनागनाथ हलकंबे (वय ४३, सर्व रा. गुळहल्ली, ता. तुळजापूर) तसेच राहुल चनबसप्पा चज्ञैगुले (वय ३४, रा. सुलतानपूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे तिरट मटका जुगार खेळताना आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ८७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

स्थानिक परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
Top