भूम-वाशी पोलिसांची संयुक्त धडक; १६ लाख ५८ हजारांचा  प्रतिबंधित गुटखा व दोन वाहने जप्त

भूम, दि. ११ ऑगस्ट : 

भूम व वाशी पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या धडक कारवाईत दोन पिकअप वाहनांसह १६ लाख ५८ हजार ५२२ किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहने जप्त करण्यात आली. धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दहिफळ शिवारात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक  अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-23-AU-5810) आणि अशोक लेलँड पिकअप (MH-14-EM-5173) या संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 'गोवा १०००' गुटखा, केसरीयुक्त विमल पान मसाला, 'व्ही-१' सुगंधित तंबाखू, 'शॉट ९९९' सुगंधित तंबाखू तसेच 'डायरेक्टर स्पेशल' पान मसाला यांचा समावेश आहे. या कारवाईत ६,५८,५२२ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि सुमारे १० लाख किमतीची दोन पिकअप वाहने असा एकूण १६,५८,५२२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी  रोहित दिनेश फंदी (वय २५) यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, दोन्ही वाहनांचे अज्ञात चालक तसेच या अवैध वाहतुकीमागील सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक  अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक  शिंदे,  कानगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  खांडे,  सावंत, पोलीस उपनिरीक्षक  बर्डे,  झराड तसेच भूम व वाशी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
 
Top