नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा
तिरंग्याला मानवंदना; प्रभातफेरी, देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावले
नळदुर्ग, दि. १५ ऑगस्ट :
शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात झालेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाने स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला विशेष झळाळी मिळाली.
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताच्या सुरांनी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यास पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस अधिकारी अख्तर सय्यद, पोलीस कर्मचारी, नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, भाजपचे सुशांत भूमकर, नगरसेवक दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, रिजवान काझी, इमाम शेख, माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, किशोर नळदुर्गकर, शिवसेना उबाठाचे माजी कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, स्वप्नील काळे, धिमाजी घुगे, सिकंदर काझी, कैलास चव्हाण, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, बलभिम मुळे, अनिल पाटील आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, आयुब शेख, अझर शेख, महमंद फुलारी, दत्तात्रय सर्जे, जयभीम वाघमारे, तसेच पुरातत्त्व विभागाचे नागनाथ गवळी, रितेश कांबळे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, नगरपालिका प्रशासन तसेच सोहन कांबळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्यामुळे नळदुर्गकरांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.