ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडा; पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर पाटील यांचे आवाहन; नळदुर्ग मध्ये बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नळदुर्ग, दि. २२ ऑगस्ट :
ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव शांततेत, सलोख्याने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर पाटील यांनी केले. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नळदुर्ग पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आगामी ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने नागरिक, पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना मनोहर पाटील यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा देऊ नये, अफवा अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाळा
पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड म्हणाले, समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर, फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट किंवा प्रसारित करू नयेत. संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस एमआयएमचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, हाफिज निमतुल्ला इनामदार, हाफिज मुशा जमादार, शिवाजी गायकवाड, ईद-ए-मिलाद कमिटीचे अध्यक्ष शायान काझी, उपाध्यक्ष युनूस इनामदार , इम्रान पठाण,
युसूफ शेख, माजी नगरसेवक असद एखाने, पोलिस कर्मचारी तुकाराम जांभळे यांच्यासह शांतता समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
किल्ला गेटपासून रॅली; सायंकाळी धार्मिक प्रवचन
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांनी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नळदुर्ग शहरातील किल्ला गेट येथून रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता असार मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात येणार असून तिचा समारोप असार मस्जिद येथे होणार आहे.
सायंकाळी ८ वाजता किल्ला गेट येथे हाफीज सय्यद सगीर अहमद यांचे धार्मिक प्रवचन होणार आहे. पोलिस प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.