नळदुर्ग येथे रात्री एसटीचा ‘मनमानी’ कारभार; वाहतूक नियंत्रका अभावी प्रवाशांची धावपळ;
रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी; महिला भाविकांच्या सुरक्षेलाही मिळणार आधार
नळदुर्ग, दि. २२ ऑगस्ट :
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहरातून राज्य परिवहन महामंडळाच्या ४० हून अधिक एसटी बस रात्री १० ते सकाळी ६ वाजण्याच्या वेळेत धावत असतात. मात्र, रात्री बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काही बस बसस्थानकात न थांबता बायपासमार्गे जात असल्याच्या तक्रारी असून, प्रवाशांना महामार्गावर उतरविले जात असल्याने रात्रीच्या वेळी त्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
नळदुर्ग शहराशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंभरहून अधिक गावांचा दैनंदिन व्यवहारासाठी संपर्क आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांतून नळदुर्ग व ग्रामीण भागातील प्रवासी रात्रीच्या वेळी येतात. त्यामुळे रात्रीच्या एसटी वाहतुकीला विशेष महत्त्व आहे.
मात्र, रात्री बसस्थानकात बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा बस बाहेरूनच निघून गेल्याचे लक्षात येते. बस येताच प्रवाशांना धावत-पळत बस गाठण्याची वेळ येते. काही बस बायपासमार्गे जात असून, नळदुर्ग शहरात न येता महामार्गावरील खंडोबा मंदिर परिसरात प्रवाशांना उतरविल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः महिला प्रवाशांना रात्रीच्या वेळी तेथून शहरात येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत नियंत्रकाची गरज
नळदुर्ग बसस्थानकात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. रात्री १० नंतर बसस्थानकात कर्मचारी नसल्याने प्रवाशांना मार्गदर्शन करणारे कोणीही उपलब्ध नसते. त्यामुळे एसटी बसचे नियोजन, थांबा आणि मार्ग याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
तुळजापूर तसेच कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या भाविकांचीही रात्रीच्या वेळी मोठी वर्दळ असते. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने बसस्थानकावर वाहतूक नियंत्रकाची उपस्थिती राहिल्यास त्यांना सुरक्षित वातावरण मिळू शकते. रात्रीच्या वेळी बायपासवर प्रवाशांना उतरविण्याच्या प्रकारालाही आळा बसण्याची शक्यता आहे.
तुळजापूरच्या भाविकांसाठीही महत्त्वाचे ठिकाण
नळदुर्ग हे महामार्गावरील महत्त्वाचे शहर असून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही हे प्रमुख मार्गावरील ठिकाण आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळेत एसटी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक आहे. बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक उपलब्ध असल्यास तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना योग्य बसची माहिती मिळून त्यांची गैरसोय टाळता येणार आहे.
सहा महिन्यांपूर्वी मागणी; अद्याप दुर्लक्ष
नळदुर्ग बसस्थानकात रात्रीच्या वेळेस वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या वतीने सुमारे सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
महिला प्रवाशांची सुरक्षा, भाविकांची सोय आणि बायपासवर प्रवाशांना उतरविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.