घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी ११ हजारांची लाच; प्रशासकास एसीबीने रंगेहाथ पकडले ; स्वतःच्या हप्त्यासाठी चार, मित्राच्या हप्त्यासाठी सात हजारांची मागणी
नळदुर्ग, दि. २२ ऑगस्ट :
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक सुरेश श्रीमंत बिराजदार यांना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (ता. २१) जळकोट येथे ताब्यात घेतले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मजूर असून त्यांना २०२५-२६ या वर्षासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. घरकुलाचे दोन हप्ते मिळाल्यानंतर तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेऊन देण्याच्या मोबदल्यात बिराजदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी चार हजार रुपये, तसेच त्यांच्या मित्राच्या घरकुलाच्या हप्त्यासाठी सात हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने धाराशिव एसीबीकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष जळकोट ता. तुळजापूर येथे सापळा रचला. बिराजदार यांनी तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्या घराची झडती घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दि.२१ ऑगस्ट रोजी उशिरा पर्यंत सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलिस अधीक्षक शशिकांत शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब एम. नरवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलिस निरीक्षक विजय वाघे, पोलिस हवालदार आशिष पाटील, अमर माने, चापोहेवा कुरडे आणि पोलिस शिपाई जाकीर काझी यांचा सहभाग होता.