नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या भूसंपादनाला वेग द्या ; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन; जिल्हाधिकाऱ्यांना खासदार ओमराजे निंबाळकर व शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे निर्देश

नळदुर्ग, दि. १५ :

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या संरेखनातील बाधित क्षेत्राचे तातडीने संपादन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सरनाईक यांची भेट घेऊन शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न मांडला. यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर व संबंधित शेतकऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी सांगितले.
नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या कामासाठी बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन व मोबदल्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या प्रकरणात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करून मोजणी, संयुक्त अहवाल व पुढील भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी
न्यायालयीन आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेत बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून द्यावा, तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी भूमिका समितीने निवेदनातून मांडली.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, भूसंपादन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन प्रश्न मांडला आहे. मात्र, अपेक्षित कार्यवाहीला विलंब होत असल्याने आता पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे.
‘बैठकीतून प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा’
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खासदार ओमराजे निंबाळकर आणि बाधित शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे निर्देश दिल्याने महामार्ग भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

 प्रशासनाने बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या व न्यायालयीन आदेशांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी केली.

निवेदन देताना समितीचे जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तालुकाध्यक्ष पांडित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव बिराजदार, अशोक पडोळे, संतोष फडतरे, गुलाब शिंदे, तसेच तालुका उपाध्यक्ष महेश घोडके, व्यकट पाटील,  श्रीकात पोतदार आदी शेतकरी उपस्थित होते.

 
 
Top