सीमेवर लढलेल्या वीर जवानाच्या वीरपत्नीचा स्वातंत्र्यदिनी सन्मान ; नळदुर्ग बसस्थानकात साडी-चोळी, शाल व पुष्पहाराने गौरव

नळदुर्ग, दि. १५ ऑगस्ट :

१९८७ मध्ये श्रीलंकेत झालेल्या युद्धादरम्यान बॅटल फायरिंगमध्ये वीरमरण आलेले गुळहळ्ळी  ता.तुळजापूर या गावातील जवान रामा गायकवाड यांच्या वीरपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई रामा गायकवाड यांचा ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भावपूर्ण सन्मान करण्यात आला.

 नळदुर्ग एस.टी. बसस्थानकात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात साडी-चोळी, शाल व पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पोलिस प्रशासनातील दिवंगत पोलिस अधिकारी महादेव हांडे यांच्या पत्नी श्रीमती सिमंताबाई महादेव हांडे यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. वीर जवानाच्या कुटुंबीयांप्रति असलेले सामाजिक उत्तरदायित्व जपत हा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.

‘सैनिक सीमेवर आहेत म्हणून आपण सुरक्षित’
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना अनेक जवान आपल्या प्राणांची आहुती देतात. त्यांच्या त्यागामुळेच देशातील जनता शांततेत व सुरक्षितपणे जीवन जगत आहे. त्यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांप्रति समाजाचे उत्तरदायित्व असून, त्यांच्या कार्याला सलाम करण्याच्या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी माजी सैनिक आबाजी जाधव, शिवाजी माने, विश्वनाथ हत्ते, भरत जाधव, मधुकर लोखंडे, प्रकाश  मोरडे, वाहतूक नियंत्रक महेश डुकरे, अनिल हांडे, मुळें,पत्रकार इरफान काझी, मोहित कलकोटे, श्रीमती लक्ष्मी फरताळे, ओमकार हांडे, राजनंदीनी हांडे, खमराली जमादार आदी उपस्थित होते.

वीरपत्नी लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सन्मानामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला देशभक्ती, कृतज्ञता आणि सैनिकांच्या त्यागाची भावनिक किनार लाभली.
 
Top