बालविवाहाचा काळा अध्याय! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाळाचा जन्म
नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल; बालविवाह लावून देणाऱ्यांसह तरुणावर कारवाई
नळदुर्ग, दि. १५ :
अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा बालविवाह एका तरुणासोबत लावून देण्यात आला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली आणि पुढे तिने एका मुलाला जन्म दिला. या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असतानाच २०२४ पासून आतापर्यंतच्या कालावधीत संबंधित आरोपींनी संगणमत करून तिचा एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला. विवाहानंतर संबंधित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने १४ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(एम), ६५(१), बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम ९ व १० तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ५(जे)(२) व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बालविवाहाला खतपाणी; कायद्याचा बडगा
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात बालविवाह घडवून आणणाऱ्यांची तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.