नळदुर्गच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ केंद्राकडे नेणार! ;प्रशासकीय काळातील कथित गैरव्यवहाराच्या स्वतंत्र चौकशीची नगरसेवकांची मागणी; खासदार निंबाळकरांची निधीची ग्वाही
नळदुर्ग, दि. १६ :
ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करून केंद्र शासनाकडे प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. दरम्यान, प्रशासकीय कालावधीत नगरपालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नळदुर्गच्या नगरसेवकांनी रविवारी (दि.१६) धाराशिव येथील संपर्क कार्यालयात खासदारांची भेट घेतली.
नगरसेवकांनी शहरातील विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांसह प्रशासकीय काळातील विविध कामांच्या चौकशीबाबत खासदार निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
‘कारभाराची स्वतंत्र चौकशी करा’
प्रशासकीय काळात घनकचरा निर्मूलन, घनवन वृक्षलागवड तसेच नगरपालिका सन २०२४-२५ मध्ये तांत्रिक सल्लागाराला देण्यात आलेल्या कामाच्या प्रकरणांची चौकशी करावी. संबंधित प्रकरणांत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच प्रशासकीय कालावधीत नगरपालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही नगरसेवकांनी खासदारांकडे केली.
पर्यटननगरी म्हणून नळदुर्गचा कायापालट
नळदुर्ग हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असल्याने त्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ शहराला मिळवून देऊन पर्यटन, रस्ते, पाणी, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विकास करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
‘निधी कमी पडू देणार नाही’
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नळदुर्गच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. ‘नळदुर्गचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचला, तर त्याचा लाभ केवळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला होईल,’ असे त्यांनी नमूद केले.
शहराच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून तो केंद्र शासनासमोर मांडण्यात येईल. तसेच खासदार निधीतूनही आवश्यक त्या विकासकामांसाठी सढळ हस्ते निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी आणि नगरसेवक सुधीर पोतदार उपस्थित होते.