स्वातंत्र्यदिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण , दि.१६ ऑगस्ट:
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (AIILSG) कल्याण विभागीय केंद्राच्या वतीने देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कल्याण (पूर्व) येथील कडोंमपा वॉर्ड क्र. ४ ‘जे’ कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी संस्थेचे मुख्य वित्तीय अधिकारी देवाशीष पंड्या, प्रभागाच्या नगरसेविका शितलताई मंढारी, विभागीय संचालक मारुती खोडके, तसेच डॉ. पुरुषोत्तम टिके व डॉ. विनीत शिंगारे यांची उपस्थिती होती.
संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रातील विद्यार्थी आणि प्रभागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी रक्तगट, रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, बीएमआय आदी आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वक्तृत्व व गीतगायन सादर करून वातावरणात देशभक्तीची रंगत निर्माण केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्राचे कर्मचारी अनिल जाधव, संतोष पाटील, तानाजी पाटील व अजित चव्हाण यांनी परिश्रम घेतले. ओंकार नागरगोजे यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल सोनवणे यांनी आभार मानले.