मराठा गल्लीत जनता दरबार ; २७ तक्रारींची नोंद, लाडकी बहीण, श्रावणबाळ योजनेसह नागरिकांच्या विविध मागण्या
नळदुर्ग, दि. १६ ऑगस्ट :
नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ५ मधील मराठा गल्ली येथे रविवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात नागरिकांनी विविध नागरी व सामाजिक प्रश्न मांडत एकूण २७ तक्रारी व मागण्या प्रशासनाकडे नोंदविल्याची माहिती नगरसेवक तानाजी जाधव यांनी दिली.
यावेळी लाडकी बहीण योजना, श्रावणबाळ योजना यांसह परिसरातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. तसेच पारायण कट्ट्यासमोर नागरिकांच्या सोयीसाठी बाकडे बसविणे आणि युवकांसाठी व्हॉलीबॉल किट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागामार्फत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी समोर मांडण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या जनता दरबारास पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक तानाजी जाधव, नगरसेविका सौ. राणी सुरवसे, शिवाजी सुरवसे, स्वीय सहाय्यक अबुल हसन रजवी, पांडुरंग गायकवाड, कुरुक्षेत्र किल्लेदार, कांताबाई जगताप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य
नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून प्रभागनिहाय नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या थेट जनता दरबारात मांडाव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.