अंमली पदार्थांच्या मुळावर घाव; धाराशिवमध्ये प्रशासन अलर्ट!
गावोगावी जनजागृती, ग्रामसभेत शपथ; ड्रग्ज तस्करांवर कडक कारवाईचे आदेश

धाराशिव, दि. ३१ ऑगस्ट : 

धाराशिव जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज, गांजा, अफू तसेच अंमली पदार्थांच्या लागवडीसंदर्भात सातत्याने गुन्हे करणाऱ्या आरोपींवर PIT-NDPS कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष किर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, अन्नभेसळ, डाक, शिक्षण व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसभेत अंमली पदार्थविरोधी शपथ व जनजागृती करण्यात यावी. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक बॅनर व पोस्टर लावून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कार्यरत असून, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, खरेदी-विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन समितीचे अध्यक्ष किर्तीकिरण पुजार व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.
 
Top