भटक्या-विमुक्तांच्या हक्कांसाठी शिवसेना मैदानात; एकनाथ शिंदेंची ग्वाही
जन्मदाखला, रेशनकार्डासाठीचा संघर्ष थांबविण्याचा निर्धार; मुंबईत भव्य महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १ सप्टेंबर :

स्वातंत्र्यानंतरही तब्बल पाच वर्षे काटेरी कुंपणात अडकवून ठेवलेल्या भटक्या-विमुक्त समाजाला ३१ ऑगस्ट १९५२ रोजी बंधमुक्त करण्यात आले. मात्र, स्वातंत्र्याची ७५ वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेल्यानंतरही जन्मदाखला, रेशनकार्ड यांसारख्या मूलभूत कागदपत्रांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब निश्चितच अमानवीय आहे.

 भटक्या-विमुक्त समाजाला त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, शिवसेना या लढ्यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
षण्मुखानंद सभागृहात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने ‘शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भटक्या-विमुक्त समाजातील ५२ जातींचे हजारो प्रतिनिधी या परिषदेसाठी मुंबईत दाखल झाले होते. वासुदेव, गोंधळी, पोतराज, वैदू, नंदीबैलवाले यांच्या पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांनी सभागृह परिसराला जणू लोकसंस्कृतीच्या उत्सवाचेच रूप आले होते.
शिंदे यांनी भाषणाची सुरुवात बंजारा भाषेत करून उपस्थितांची मने जिंकली. राज्यातील सुमारे दीड कोटी भटक्या-विमुक्त बांधवांच्या ५२ जातींना संजय राठोड यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले आहे. ‘डीएनटी’चे (डीनोटीफाईड ट्राईब्ज) वादळ मुंबईत आले आहे. जगण्यासाठी तुम्हाला भटकंती करावी लागली; आता स्थिर जीवन मिळाले पाहिजे,’ असे सांगत शिंदे यांनी या समाजाच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

संजय राठोड यांनी स्थापन केलेल्या ‘अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त सेने’च्या माध्यमातून समाजाला हक्कांसाठी एकत्रित व्यासपीठ मिळाले आहे. घटनात्मक हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी शिवसेना ठामपणे उभी राहील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
लोककलेला जागतिक व्यासपीठ
भटक्या-विमुक्त समाजाच्या समृद्ध लोककला आणि हस्तकलेला जागतिक ओळख मिळावी, यासाठी मुंबईत पर्यटन विभागाच्या माध्यमातून विशेष महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी परिषदेत दिली.

दरम्यान, परिषदेत शिंदे यांच्या हस्ते ‘शोध भाकरीचा’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच ‘डीएनटी पोर्टल’ आणि भटक्या-विमुक्त समाजातील ५२ जातींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातून  सचिन राठोड , रवी महाराज राठोड, आदित्य राठोड,
रामदास  पवार , बालाजी देवकर  दिलीप   पवार, शिवाजी मेघा पवार, पवार संतोष ,चंद्रकांत धनसिंग राठोड ,नेताजी  राठोड ,जीत शिवाजी राठोड ,अंकुश गोपीनाथ पवार , विष्णु राठोड, विकास जाधव, पिंटु राठोड आदीसह शेकडो जण सहभागी झाले होते.

 
Top