तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा; अन्यथा आमरण उपोषण; नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा पोलिस प्रशासनाला इशारा

तुळजापूर, दि. २४ ऑगस्ट : 

शहरातील विविध भागांत परवाना व नियमांचे पालन न करता सुरू असल्याचा आरोप असलेल्या मटका, जुगार, हातभट्टी, ताडी, दारू विक्री तसेच अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करा; अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

याबाबत नगराध्यक्ष गंगणे यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले. शहरातील काही प्रभागांमध्ये संबंधित परवानगी व नियमांचे पालन न करता अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा व्यवसायांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे गंगणे यांनी म्हटले आहे.

पोलिस प्रशासनाने संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून व्यवसायांची कागदपत्रे, परवाने व अन्य आवश्यक बाबींची तपासणी करावी. परवानगी नसल्याचे अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यवसाय तातडीने बंद करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तीन दिवसांची मुदत
शहरातील कथित अवैध धंद्यांवर तीन दिवसांच्या आत कारवाई करून संबंधित व्यवसायांच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात असे व्यवसाय पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्तारूढ नगरसेवक तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, नगरसेवक माऊलीराजे भोसले, माजी नगरसेवक किशोर साठे, विजय कंदले, सुनील पिंटू रोचकरी, मधुकर शेळके, सागर कदम, सज्जनराव साळुंखे, दादासाहेब खपले, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, लखन पेंदे, नरेश अमृतराव, नगरपरिषदेचे गटनेते औदुंबर कदम, आनंद सावंत, दिनेश क्षीरसागर, रत्नदीप भोसले, मनोज गवळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, नगराध्यक्षांच्या या निवेदनानंतर पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि कथित अवैध धंद्यांविरोधात प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे तुळजापूर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 
Top